Amitabh Bachchan Information In Marathi | अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन माहिती
अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन Amitabh Bachchan Information In Marathi हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान अभिनेते आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात मिळविलेले यश अन्य कोणत्याही अभिनेत्याला मिळविता आले नाही. एक काळ असा होता की, केवळ अमिताभ बच्चन हे पिक्चर मध्ये आहेत म्हणून लोक पिक्चर बघायला जात असत. त्यांना मिळालेली उपाधी ‘अँग्री यंग मॅन’ यामुळेच ते सुपरस्टार झाले. त्यांना केवळ अँग्री यंग मॅन हीच उपाधी नाही. शहेनशहा, बिग बी आणि स्टार ऑफ द मिलेनियम देखील संबोधले जाते. अशा या सुपरस्टार अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनबद्दल तुम्हाला माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर हा लेख पूर्ण वाचा.
अमिताभ बच्चन यांचे प्रारंभिक जीवन :
अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 ला उत्तरप्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिवंशराय बच्चन होते तर त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन होते. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे एक प्रसिद्ध हिंदी कवी होते. त्यांच्या आई तेजी बच्चन ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. एका सुसंस्कृत वातावरणात अमिताभ बच्चन लहानाचे मोठे झाले. वास्तविक पाहता त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव होते. बच्चन कुटुंबाचे खरे आडनाव श्रीवास्तव आहे. हरिवंशराय बच्चन यांचे स्नेही कवी सुमित्रानंदन पंत यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अमिताभ हे नाव दिले. अमिताभ यांच्या भावाचे नाव अजिताभ असे आहे.
त्यांचे शिक्षण नैनीताल येथे झाले. तसेच दिल्ली विद्यापीठातील करोरीमल या महाविद्यालयात देखील त्यांनी पुढील शिक्षण घेतले.
अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट कोणता ?
अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी हा आहे. हा चित्रपट 1969 ला आला.अभिनेत्री नूतन यांचा सोबत त्यांनी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. नायिकाप्रधान असलेल्या या चित्रपटात त्यांनी उत्तम अभिनय केला आहे.
त्यानंतर त्यांनी बरेच चित्रपट केले. पण त्यांना हवे तसे यश मिळत नव्हते.
अमिताभ बच्चन यांच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट जंजीर :
असे म्हणतात की,आपल्याला हवे तसे यश मिळत नसल्याने निराश होऊन अमिताभ चित्रपट सृष्टी सोडून परत जात होते. परंतु जया भादुरी ( बच्चन) यांच्या प्रयत्नाने त्यांना जंजीर हा चित्रपट मिळाला. अमिताभ यांनी हा चित्रपट स्वीकारला. 1973 ला आलेल्या या चित्रपटाने अमिताभचे जीवनच बदलवून टाकले. अप्रतिम अभिनय करत त्यांनी त्यातील इन्स्पेक्टर विजय हे पात्र साकारले. या चित्रपटात अमिताभसोबत जया भादुरी आणि प्राण होते. तर खलनायकाची भूमिका अजित यांनी साकारली होती.
जंजीरचे निर्माता आणि निर्देशक प्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट अमिताभला देऊन अमिताभच्या करिअरला नवसंजीवनी दिली.
अमिताभ बच्चन यांनी स्थापन केलेली कंपनी – एबीसीएल :
अमिताभ बच्चन यांनी 1996 मध्ये एबीसीएल नावाची प्रोडक्शन कंपनी स्थापन केली होती.सुरुवातीला ही कंपनी नफ्यात होती. मात्र काही काळाने अमिताभचे ग्रह फिरले. ही कंपनी बुडाली. अमीताभ फार कर्जात बुडाले. ते इतके कर्जबाजारी झाले कि, त्यांना आपला बंगला गहाण ठेवण्याची वेळ आली होती. त्यात अनेकांचे रुपये बाकी होते ते लोक रुपयांसाठी अमिताभकडे तगादा लावू लागले. या अशाच लोकांमध्ये होती एक प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया.
1997 साली आलेला अमिताभचा मृत्युदाता या चित्रपटात डिंपल होती. हा चित्रपट काही चालला नाही. असे म्हणतात कि , त्यावेळेस डिंपलने आपल्या फीस साठी अमिताभकडे फार तगादा लावला होता. अमिताभ हा त्रास आजही विसरू शकत नाही.
पण हा महानायक या ही संकटातून उभारला ते केबीसी आणि यश चोप्रा यांच्या मोहब्बते या चित्रपटामुळे.
अमिताभ आणि कौन बनेगा करोडपती( केबीसी) :
अमिताभ यांच्यावर झालेला कर्जाचा डोंगर आणि त्यातून त्यांची झालेली बिकट परिस्थिती यातून सावरले ते कौन बनेगा करोडपती ( केबीसी) या शो मुळे. केबीसीच्या पहिल्या भागाचे मानधन अमिताभला सुमारे पंधरा करोड मिळाले. केबीसी हा शो लोकप्रिय झाल्यावर अमिताभला जाहिराती देखील पुष्कळ मिळाल्या. त्यातून अमिताभला आपले पुष्कळ कर्ज फेडता आले.
केबीसीचा आता 13 वा सिझन झाला आणि अजूनही अमिताभ हा शो होस्ट करीत आहेत. केबीसीमुळे अमिताभच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आणि त्याच्या आयुष्यातील खडतर प्रसंग निघून गेले.
अमिताभ आणि पंतप्रधान राजीव गांधी यांची मैत्री :
बच्चन कुटुंबियाचे नेहरू आणि गांधी घराण्याशी फार जुने आणि घनिष्ठ संबंध होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अमिताभच्या आई तेजी बच्चन यांची दृढ मैत्री होती. पुढे त्यांची मुले म्हणजे पंतप्रधान राजीव गांधी आणि अमिताभ हे ही खास मित्र बनले.
अमिताभ बच्चन आणि राजकारण :
महानायक अमिताभ यांनी चंदेरी दुनिया गाजविल्यावर राजकारणातही त्यांनी आपले नशीब अजमावून बघितले. मात्र चित्रपट सृष्टीत त्यांना जरी यश मिळाले असले तरी राजकारणात त्यांना सफसेल अपयश मिळाले. आपले मित्र राजीव गांधी यांच्या मैत्रीमुळेच अमिताभ 1984 मध्ये राजकारणात आले. त्यावेळी त्यांनी अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांना पराभूत केले होते.
परंतु लवकरच अमिताभ यांच्या लक्षात आले कि , राजकारण हे आपले क्षेत्र नाही आणि ते राजकारणातून अलिप्त झाले. याला कारण होते बोफोर्स दलाली प्रकरणी. बोफोर्स दलाली प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले गेले. कालांतराने त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सिद्ध झाले. मात्र अमिताभ यांनी खासदारकी आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा 1987 मध्ये दिला होता. त्यावेळेस समाजवादी पक्षाचे अमरसिंग हे त्यांच्या मदतीला धावून आले होते. पुढे समाजवादी पक्षातर्फे जया बच्चन मात्र राजकारणात सक्रीय राहिल्या.
अमिताभ बच्चन यांना प्राप्त झालेले पुरस्कार :
स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
भारत सरकारने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कलेतील योगदानाकरिता 1984 ला पद्मश्री, 2001 ला पद्मभूषण आणि 2015 ला पद्मविभूषण हे पुरस्कार प्रदान केले.
2007 साली फ्रेंच सरकारने फ्रान्समधील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर ‘ ने सन्मानित केले होते.
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी फिल्म फेअर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 2019 मध्ये मिळाला.